अमरावती : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला रूग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांकडे इर्विन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रुग्णालय परिसर घाणीने वेढला असून जिल्हा शल्य चिकित्सकांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. शासनाकडून गोरगरीब नागरिकांच्या उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय २४ तास आरोग्य सेवा पुरविते. मात्र, ढेपाळलेल्या कारभारामुळे येथील रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. इर्विनच्या प्रवेशद्वारापासूनच रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. दर तासाला इर्विनमध्ये तीन ते चार रुग्ण उपचार करण्याकरिता येतात. सकाळच्या वेळी तर बाह्यरूग्ण विभागात रुग्णांची रीघ लागलेली दिसून येते. मात्र, काही वेळा आरोग्य तपासणीसाठी रुग्णांना ताटकळत राहावे लागते. ही प्रतीक्षा रूग्णांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरते. रूग्णालयात दाखल रूग्णांना देखील गैरसोयींचा सामना करावा लागतो. रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ओरड पाहूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
इर्विन रुग्णालयात वाढतेय दुरवस्था
By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST