आ. देशमुखांचे निर्देश : संबंधित विभागांची संयुक्त बैठकअमरावती : महिनाभरात शहरात तीन अपघात झाल्याच्या पार्श्वभूमिवर अनियंत्रित व विस्कळीत वाहतूक व्यवस्था वठणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून आ. सुनील देशमुख यांनी पोलीस आयुक्तालयात संपूर्ण पोलीस प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे निर्देश दिलेत. यापूर्वीच्या बैठकीमध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यांची अंमलबजावणी काही प्रमाणात झाली. परंतु सुधारणा न झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये शहराच्या संकुलातील अनियंत्रित पार्किंग मोकळ्या करणे, शहरातील आॅटोरिक्षांचे ग्रामीण व शहरी असे वर्गीकरण करणे, उडाणपुलाखाली पे अॅन्ड पार्किंगची व्यवस्था त्याचप्रमाणे नव्याने काही ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल निर्माण करणे, असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. परंतु यात प्रशासनामार्फत कोणत्याच प्रकारे सुधारणा करण्यात आल्या नाहीत. यामुळे शहरातील रस्ते रुंद असूनही ते अरुंद झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून नाहक अपघातग्रस्त होऊन जीव गमवावे लागत आहे, असे स्पष्ट मत आ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांवर आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील जे अपघातप्रवण स्थळे किंवा चौक आहेत याचे शास्त्रशुद्ध अध्ययन करून त्यावर उपाय शोधून त्याचा अहवाल ताबडतोब देण्याचे निर्देश आ. सुनील देशमुख यांनी दिले. बैठकीला पोलीस आयुक्त दत्तत्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, पोलीस उपायुक्त वाहतूक, शशीकुमार मीणा, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक, डोंगरदिवे, महापालिका शहर अभियंता, सदार, अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, सहायक संचालक नगर रचना, कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता एन.आर. देशमुख, पाठणकर यासह मनपा, पोलीस वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘त्या’ वाहतूक पोलिसांवर कारवाईशहरातील चौकाचौकामध्ये वाहतूक पोलीस तैनात असतात. यांचे अस्तित्व कधीच वाहतूक नियंत्रित करीत असल्याचे निदर्शनास येत नाही. बहुतेक वेळी हे कर्मचारी रस्त्याचे कडेला थांबलेले आढळतात. याबाबतीत वारंवार सूचना करूनही सुधारणा झाली नाही. यावर तोडगा म्हणून आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन अशा पद्धतीने नियुक्त केलेल्या पॉर्इंटवर वाहतूक पोलीस न आढळल्यास किंवा अन्यत्र रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे आढळल्यास त्यांचे छायाचित्र मोबाईलवर काढून पोलीस विभागाला ८००७३११००६ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारा
By admin | Updated: March 11, 2017 00:07 IST