स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई
चांदूर बाजार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती मंगळवारी गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कोंडवर्धा येथे दारूची अवैध वाहतूक पकडून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी कोडवर्धा जवळ सापळा रचून चारचाकी वाहन ताब्यात घेतले. त्या वाहनात देशी दारूच्या बाटल्यांचे ७८ हजार रुपयांचे १६ बॉक्स तसेच २ हजार ४०० रुपयांच्या इतर बॉटल, दीड लाखांची चारचाकी व २२ हजार २९० रुपये रोख असा एकूण २ लाख ५४ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे गोपाल उपाध्याय व त्यांचा चमूने केली. यात आरोपी अतुल हरडे (४२, रा. शिराळा) याला अटक केली आहे.