दुचाकीने वाहतूक : कोरोनाकाळात राज्य उत्पादन शुुुल्क विभाग झोपेत
पथ्रोट : कोरोना संसर्गाच्या काळात देशी दारूची दुकाने बंद असल्याने अवैध दारूविक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पथ्रोट पोलिसांनी गस्त वाढविली आहे. त्याअनुषंगाने परतवाड्याहून परसापूर येथे अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती पथ्रोट पोलिसांना मिळाली. त्याआधारे ठाणेदार एस.के. जाधव यांचे मार्गदर्शनात सहायक ठाणेदार राहुल चौधरी व व पथकाने परसापूर येथील बोराळा फाट्यावर सापळा रचून पाच अवैध दारूविक्रेत्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये विजय जांगडे (३२), किशोर मरकाम (रा. आठवडी बाजार, परतवाडा), शिवदास नशीबकर (४२), विजय वानखडे (४८ रा. महिराबपूरा अचलपूर) व गजानन डोईफोडे (३९ , महिराबपुरा, अचलपूर) यांचा समावेश आहे. पाचही आरोपी तीन दुचाकींवर १ लाख ३८ हजार ५१६ रुपये किमतीच्या दारूच्या चार पेट्या तसेच १५३ बाटल्या घेऊन जात होते. ठाणेदार एस.के. जाधव, सहायक ठाणेदार राहुल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वसूकार व अशोक पळसपगार, विष्णुपंत कहाने, राजाराम मेहत्रे, राजेश जाधव, नरेश धाकडे, हेमंत येरखडे, ज्ञानोबा केंद्रे, गणेश परतेकी, नरेंद्र दांडगे सहभागी झाले. तीन दुचाकी व अवैध दारू ताब्यात घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
--------