शिवसैनिक आक्रमक : तलाठ्याला धरले धारेवरदर्यापूर : पीक विम्याचे पैसे बँकेचे अधिकारी परस्पर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जात जमा करतात, या मुद्यावर चर्चा सुरू असताना एका तलाठ्याने शिवसैनिकांशी वाद घातला. या कारणावरून शिवसैनिक संतप्त झाले. शेतकऱ्यांच्या विरोधात बोलाल तर तोंड फोडू असे म्हणताच तहसील कार्यालयात काहीवेळ वातावरण तापले होते. दर्यापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान विमा योजनेची मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक होती. यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे दर्यापूर तालुका प्रमुख सुनील डिसे, बाजार समितीचे संचालक गोपाल अरबट, सतीश साखरे, दिलीप राहाटे, प्रवीण बायस्कार व इतर शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवसैनिकांनी २०१५-१६ चे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले पैसे बँकांनी शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्ज भरण्यात परस्पर जमा करू नये, ही चर्चा सुरू असताना वडनेर गंगाईचे तलाठी शरद दयालकर यांनी चर्चेत भाग घेऊन आपण शेतकऱ्यांना जनजागृती का केली नाही, असा उलट प्रश्न केला. यावर सर्व शिवसैनिक संतप्त होऊन आपण शेतकऱ्यांची थट्टा करता तर शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात बोलाल तर तोंड फोडू असे सुनील डिके यांना म्हणताच येथील वातावरण अचानक तापले. तहसीलदार राहूल तायडे व तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोटे यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांना शांत केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनाही यावेळी त्यांच्या कामकाजावरुन धारेवर धरण्यात आले. या प्रकरणाची तहसील कार्यालयात उशिरापर्यत चर्चा सुरु होती. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या विरोधात बोलाल तर तोंड फोडू!
By admin | Updated: July 20, 2016 00:11 IST