अमरावती : गणेशोत्सवादरम्यान काही मंडळांचे पदाधिकारी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी उकळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करु नये. अशा प्रकारची कुठलीहीे तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्याविरुद्ध थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी स्पष्ट केले आहे. वसंत हॉल येथे आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.दरवर्षी गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शहरात गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुरुवारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून वसंत हॉल येथे समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहरातील जवळपास ८४ गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.गणेशमूर्ती ही आठ फुटांपेक्षा अधिक उंचीची नसावी, मिरवणूक वेळेच्या आत काढावी, मूर्तीसमोर खाद्यपदार्थ (नैवेद्य) उघड्यावर ठेऊ नये, मिरवणुकीत राजकीय पुढाऱ्यांचे पोस्टर लावू नये, अश्लिल गाणी वाजवू नये, लाऊडस्पीकरचा आवाज ७५ डेसीबलपेक्षा अधिक असू नये, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्देश गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले आहेत. वर्गणीची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा नोंदविला जाणार आहे.
वर्गणीची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा होणार दाखल
By admin | Updated: August 21, 2014 23:30 IST