निर्णय : ७६२ शिक्षकांना वेतनवाढ देण्यास मान्यताअमरावती : राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी मंजूर करण्याच्या आदेशाची शासनाने अंमलबजावणी केली आहे. २००५ ते २०१२ दरम्यानच्या १ हजार ५५ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना लाभ मिळणार आहे. न्यायालयीन अवमानाचा मुद्दा केल्यावर अखेर त्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाला करणे अखेर भाग पडले आहे. शिक्षक पुरस्कार जाहीर झाले होते; पण त्यात वेतनवाढ न देण्याची सुधारित बाब अंतर्भूत न झाल्याने शासनाने वेतनवाढीस मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर २००५ ते २०१२ या काळातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढी न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यात. न्यायालयाने त्या एकत्रित करून निर्णय देताना १६ डिसेंबर २०१४ रोजी या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीची रक्कम सहा महिन्यांत देण्याचे निर्देश शासनास दिले. मात्र, ठरावीक कालावधीत अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने ठरविलेल्या काळातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना अग्रीम वेतनवाढी देण्याबाबत १ फेब्रुवारी २०१६ रोजी निर्णय घेतला. परंतु आर्थिक तरतुदीचे कारण देत व वेतनवाढी देण्याची तरतूद नसल्याचे नमूद करून न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने ती फेटाळली. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण, वित्त व सामान्य प्रशासन विभागाच्या संयुक्त बैठकीत या वेतनवाढीला मंजुरी देण्यात आली. मात्र, ही वाढ पाचव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार दिल्याने व न्यायालयीन आदेश सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने असल्याने पूर्वीचा निर्णय १६ सप्टेंबर २०१६ च्या आदेशानुसार रद्द करण्यात आला. मात्र, केवळ ३२ शिक्षकांनाच लाभ मिळाला. त्याचा विचार करून आतादोन वेतनवाढींचा सुधारित शासन निर्णय झाला आहे. सन २००५ ते २०१२ या कालावधीतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांबाबत हा नवा निर्णय आहे. या १ हजार ५५ शिक्षकांपैकी ३८ शिक्षकांना दोन अग्रीम वेतनवाढी मंजूर करण्यात आल्या. त्यांना वगळून अन्य २५५ शिक्षकांना वेतनवाढी देण्यात आल्या. उर्वरित ७६२ शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार दोन अग्रीम वेतनवाढी देण्यास मान्यता मिळाली आहे. (प्रतिनिधी)
आदर्श शिक्षकांना आता मिळणार दोन वेतनवाढी
By admin | Updated: February 24, 2017 00:17 IST