अमरावती : गुलीस्तानगरातील रहिवासी राजा ऊर्फ शेख राजीक शेख इमाम (३०) याची निर्घृण हत्या करुन मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह नवसारी येथील नाल्यात फेकून दिला होता. तपासादरम्यान अनैतिक संबंधातून पत्नीनेच शेख राजीकचा तिच्या प्रियकराचा हातून गेम केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शेख राजीकची पत्नी आलीया परवीन शेख राजीक (२४) हिला अटक केली आहे.शेख राजीक हा आॅटो चालक होता. त्याचा रक्तरंजीत मृतदेह ६ जून रोजी नवसारी मार्गावरील एका नाल्याजवळ आढळला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी हत्या करुन पुरावा नष्ठ करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी नसीम खान हबीब खान (२६,रा. गुलीस्तानगर) व शेख समद शेख मोहम्मद (२४,रा. हाजरानगर) या दोन आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपी नसीम खान याने पोलिसांना मृत शेख राजीक याची पत्नी आलीया परवीनसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगीतले. शेख राजीक हा दोघांमध्ये आडकाठी बनत होता. त्यामुळे आलीया परवीनच्या सांगण्यावरुन नसीम खानने त्याला संपविण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी आलीया परवीनने शेख राजीकचा मोबाईल घरी ठेवून त्याला नसीम खान व शेख समदसोबत बाहेर पाठविले. त्या दोघांनी त्याला अति प्रमाणात दारु पाजून त्याची दारुच्या नशेत दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली व त्याचा मृतदेह नवसारी येथील नाल्याजवळ फेकून दिला. आलीया परवीनच्या सांगण्यावरुन नसीम खानने शेख राजीकचा गेम केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध कट रचणे, हत्या करणे व पुरावा नष्ट करण्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन आलीया परवीनला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पत्नीनेच केला प्रियकराच्या हातून पतीचा गेम
By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST