अमरावती : घरगुुती वादातून पतीसह सासरच्या मंडळींनी हातपाय बांधून, अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासनी खुर्द गावात घडली. यात प्रणाली ऊर्फ संचाली किशोर वाटाणे (२८) ही महिला ९० टक्के भाजली. तिने दिलेल्या बयाणाच्या आधारे पोेलिसांनी सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हे नोंदविले आहेत. गंभीर जखमी अवस्थेतील प्रणालीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती येथील गाडगेनगर परिसरातील रहिवासी प्रणाली चिकटे हिचा विवाह ८ जुलै २०१२ रोजी किशोर वाटाणे याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पतीने पत्नीचा मानसिक छळ सरू केला. प्रकरण महिला सेलकडेही दाखल करण्यात आले होते. महिला सेलच्या समुपदेशनामुळे प्रणाली व किशोर यांच्यात समन्वय घडून आला होता. परंतु काही दिवसांनी पुन्हा प्रणालीला सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. १२ आॅक्टोबर रोजी प्रणाली घरगुती कामात व्यस्त असताना पती किशोरने तिच्यासोबत वाद केला. सासरच्या मंडळींनी हस्तक्षेप करण्याऐवजी संगमनत करून प्रणालीचे हातपाय बांधले व तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यामध्ये ती ९० टक्के भाजली. गावकऱ्यांच्या मदतीने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रणालीचे मृत्युपूर्व बयाण नोंदविले. त्यात प्रणालीने पती, सासू व सासऱ्यांनी रॉकेल ओतून पेटविल्याची माहिती पोलिसांना दिली.प्रणालीचा अतोनात छळ करणाऱ्या आरोपींनी प्रणालीला मुलगी झाल्यामुळे तिचा जीव घेण्याचा डाव आखला, असा आरोप भावाचा आहे. प्रणालीचे नातेवाईक रवींद्र चिकटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे पती किशोर नानासाहेब वाटाणे, सासरे नानासाहेब वाटाणे व सासू पद्मा नानासाहेब वाटाणे यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पती, सासू, सासऱ्याने जिवंत जाळले, मृत्यूशी झुंज
By admin | Updated: October 18, 2014 22:56 IST