बुलेट रॅलीचे रिंगण : रेल देखो, बस देखो आंदोलनअमरावती : क्रांतिदिनाचे औचित्य साधून येथील जनमंच लढा विदर्भाचा या संघटनेच्यावतीने शनिवारी रेल देखो, बस देखो आंदोलन, बुलेट रॅली, तरुणाईचे नृत्य, विदर्भ बंधन बांधून स्वतंत्र विदर्भ मागणीचा हुंकार चढविला. पुन्हा वेगळ्या विदर्भाच्या मागणीने आता जोर धरल्याचे चित्र या आंदोलनामुळे निर्माण झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी ११ पासून येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनवर भजन कीर्तन करुन ये-जा करणाऱ्यांचे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे जनमंचच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. यावेळी नागरिकांच्या हातावर विदर्भ बंधन बांधून वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठींबा मिळवून घेतला. स्थानिक रेल्वे स्टेशन चौक, कठोरा, शेगाव नाका, शिवाजी महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, पंचवटी चौक, इर्विन चौक व राजकमल चौकात तरुणाईने ‘फ्लॅश मॉब’ करुन जनतेचे लक्ष वेधले. 'फ्लॅश मॉब'ने वाहतूक विस्कळीतठिकठिकाणी पार पडलेल्या नृत्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काढलेल्या बुलेट रॅलीने जागोजागी रिंगण करुन या मागणीचा हुंकार वाढविला. राजकीय पक्षविरहित जन मंच संघटनेने सुरु केलेल्या स्वतंत्र विदर्भ मागणीच्या लढ्याला नागरिकांनीसुद्धा तितकाच प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. बसस्थानकावर भजन कीर्तन सुरु होताच संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणातून न्हावून निघाला. यावेळी बाहेगावी ये- जा करणाऱ्यांनीसुद्धा स्वतंत्र विदर्भ मागणीचा बंधन बांधून पाठींबा दर्शविला.रेल देखो, बस देखो आंदोलन दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याची काळजी जन मंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्वजून घेतल्याचे दिसून आले. येथील राजकमल चौकात तरुणाईच्या ‘फ्लश मॉब’ ने काही काळ वाहतूक विस्कळीत केली. मात्र वाहतूक पोलिसांनी लगेच पुढाकार घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. कालातंराने सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरु झाला. राजकमल चौकात सत्यपालाची ‘सत्यवाणी’ या कार्यक्रमाने स्वतंत्र विदर्भाची मागणी आवश्यक असल्याचे त्यांनी पटवून सांगितले. यावेळी सत्यपाल महाराजांनी विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुबलक वीज, खनीज संपदा, वन संपदा, कोळसा, पाणी, कापूस, सोयाबीन, पर्यटन अशा वैविधतेने नटलेला विदर्भ वेगळे राज्य झाल्यास बेरोजगारी थांबेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.स्वतंत्र विदर्भाची मागणीने जोर धरावा, यासाठी जन मंचचे डॉ. बबन बेलसरे, गजानन कोरे, विजय विल्हेकर, अतुल गायगोले, वसुसेन देशमुख, प्रदीप पाटील, बल्लु पडोळे यांनी पुढाकार घेतला आहे. आचल खंडारे, अक्षय लुंगे, शुभम गावंडे, गणेश मिसाळ, पंकज शिंदे, केतन पाटील, मुकेश टारपे, हर्षल रेवणे, दीपक तायडे, सुधीर दरणे, अतुल खोंड, मीनल सोनोने, प्रितम सोनोने, स्नेहा सोनोने,क्षितीज चौधरी, चेतन पांडे आदींनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती अभियानात सहभाग घेतला.
हुंकार स्वतंत्र विदर्भाचा
By admin | Updated: August 9, 2014 23:26 IST