उपचारावर खर्च न परवडणारा, वरूड शहरात शासकीय कोविड केंद्राची मागणी
संजय खासबागे
वरूड : शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. खासगी कोविड रुग्णालयात दाखल झाल्यास एक ते तीन लाख रुपयांचा खर्च होतो. तो महागडा खर्च करण्याची ऐपत नसल्याने तालुक्यातील बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण ‘होम आयसोलेटेड’ होत आहेत. यामुळे त्या बाधितांसह हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकरिता शहरात शासकीय कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
२०२० च्या एप्रिल महिन्यापासून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग वर्षभरानंतरही थांबलेला नाही. प्रशासनाचे कंटेनमेंट व बफर झोन कागदावरच आहेत. केवळ आरोग्य यंत्रणा सतर्क असून, तपासण्या आणि लसीकरण मोहीम प्रामाणिकपणे सुरू आहे. आता तर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याला बेनोडा कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात नाही, घरीच विलगीकरणात ठेवले जाते. संबंधितालाच औषधोपचाराचा खर्च करावा लागतो. खासगी कोविड सेंटरला जाण्याची ऐपत नागरिकांची राहिली नाही. खिशात लाख, दोन लाख असतील, तरच रुग्ण दाखल करून घेतला जातो, अशी खासगी कोविड रुग्णालयांत उपचार घेतलेल्या रुग्णांचा अनुभव आहे.
शासनदप्तरी वरूड तालुक्यात २ हजार ८० कोरोना रुग्णांची नोंद असली तरी प्रत्यक्षात ती संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. होम आयसोलेटेड असलेल्या कोरोना रुग्णांच्या घरावर तसे फलक लावण्यात येत नसल्याने कोरोनाग्रस्त कोण, हे ओळखणे आता कठीण झाले आहे. लोकांना काहीही सोयरसुतक राहिले नाही. शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्तीने राबवून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
सत्ताधाऱ्यांमधील दुफळी शहराला मारक
वर्षभरापासून कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. गतवर्षी कोरोना वाॅरियर म्हणून प्रसिद्धी माध्यमात छायाचित्र छापून घेणारे लोकप्रतिनिधी आज प्रत्यक्षात कुठेच दिसत नाहीत. महामारीच्या काळात भाजपच्या गटनेत्याने ११ नगरसेवकांना सोबत घेऊन वेगळी चूल मांडली. परंतु, शहरवासीयांची चिंता ना नगराध्यक्षांना, ना विरोधी बाकावरील सदस्यांना. रुग्णसंख्या वाढत असताना नगर परिषदेतून एकही निर्णय होत नसल्याचे सांगितले जाते. अधिकारी हतबल झाले आहेत. सत्ताधारी भाजपची दुफळी नागरिकांच्या मुळावर उठली आहे.
कोट
कोरोनाकाळात नागरिकांनी नियमाचे पालन करावे. मास्क लावावेत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. संचारबंदी काळात कुणीही बाहेर निघू नये, अन्यथा कारवाई कारावी लागेल. वेळप्रसंगी कोविड विलगीकरण केंद्र सुरू करू. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- किशोर गावंडे, तहसीलदार
----------------