कारवाई का नाही? : लाखो लिटर इंधनाची साठेबाजी अमरावती : तेल कंपन्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाववाढ ‘कॅश’ करण्यासाठी शहरातील बहुतांश मालकांनी बुधवारी सायंकाळी ७ ते ११ वाजतादरम्यान पेट्रोलपंप बंद ठेवण्याची शक्कल लढविली. परिणामी वाहन चालकांना बोटावर मोजण्या इतक्याच पेट्रोलपंपावर इंधन भरता आले. त्यामुळे लाखो लिटर इंधनाचा साठा करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोलपंप मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरुनही केंद्र सरकारने १६ मार्च २०१६ पासून पेट्रोलच्या दरात ३ रुपये ७ पैसे तर डिझेलच्या दरात १ रुपया ९० पैसे प्रतिलिटरने वाढ केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे भाववाढीचा लाभ घेण्यासाठी शहरातील बहुतांश पेट्रोलपंप मालकांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजतापासूनच ‘इंधन नाही’ असे फलक लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. शहरातील मोजकेच पेट्रोलपंप सुरु असल्यामुळे वाहनात इंधन भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. इर्वीन ते पंचवटी चौक या मार्गावरील दोन पेट्रोलपंप बुधवारी रात्री ८ वाजताच बंद झाले होते. नियमानुसार शहरातील पेट्रोलपंप रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे. परंतु पंपमालकांनी पेट्रोल, डिझेलची भाववाढ ‘कॅश’ करण्यासाठी पेट्रोलपंप बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने आम्ही काहीही करु शकत नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. पेट्रोेलपंप संचालकांनी ग्राहकांची फसवणूक केल्याने पेट्रोेलपंप संचालकांविरूध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सातुर्णा येथील दोन्ही पेट्रोलपंपांवर एकाच मशीनद्वारे पेट्रोल व डिझेल ग्राहकांना देण्यात आले. स्थानिक इतवारा बाजार, वलगाव मार्ग, पंचवटी चौक, नागपूर महामार्ग, परतवाडा मार्गावरही वेळेपूर्वीच पंप बंद झाले होते.
भाववाढीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलपंप बंद कसे ?
By admin | Updated: March 18, 2016 00:24 IST