डेंग्यू, साथरोगांवर खबरदारी म्हणून उपाययोजना
तिवसा : शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने त्यासाठी उपाययोजनांसाठी तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे स्वतः रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. नगरपंचायत प्रशासनदेखील कामाला लागले आहे.
तिवसा शहरात महिनाभरापासून डेंग्यूने थैमान घातले. यात डेंग्यूसदृश तापाने तिघांचा मृत्यू झाला, तर अनेकांना लागण झाली. अचानक डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणासाठी आता तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे या आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका यांना सोबत घेऊन घरोघरी दाखल होत आहेत. यात अनेक लोकांच्या घरी पाहणीदरम्यान डबके साचले असल्याचे निदर्शनास आले. कोणाला ताप वा डेंग्यूची लक्षणे दिसत असल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो.
--------------
मी स्वतः कर्मचाऱ्यांसह घरोघरी जाऊन पाहणी करीत आहे. अनेकांच्या घरात व परिसरात टायरमध्ये पाणी साचले असल्याचे निदर्शनास आले. यात अळ्यासुद्धा दिसून आल्या. त्यामुळे नागरिकांनी स्वतः परिसरात स्वच्छता ठेवावी. वेळोवेळी आरोग्य विभागाच्या सूचनाचे पालन करावे.
- ज्योत्स्ना पोटपिटे, तालुका आरोग्य अधिकारी, तिवसा