आयुक्तांचे आदेश : विनापरवानगी बांधकामांवर दंडात्मक कारवाई अमरावती : महापालिका उत्पन्न वाढीसाठीची पावले प्रशासनाने उचलली आहेत. त्यानुसार शहरातील हॉटेल, रिसोर्टच्या बांधकाम तपासणीला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात नागपूर महामार्गालतच्या ‘हॉटेल गौरी ईन’ची पाहणी करण्यात आली असून पुढच्या तीन दिवसात तपासणीचा अहवाल आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.सहायक संचालक नगररचना विभागाला शहरातील हॉटेल, रिसोर्ट, लॉजिंगचे बांधकाम तपासण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. भव्यदिव्य व प्रशस्त अशा हॉटेल बांधकामांची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाची चमू सोबतीला घेतली जाणार आहे. गुरुवारी ‘गौरी ईन’च्या बांधकामाची पाहणी करण्यात आलीे. मंजूर नकाशाप्रमाणे गौरी ईनचे बांधकाम नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती आहे. आयुक्त गुडेवार यांच्या निर्देशानुसार ज्या हॉटेल, रिसोर्टवर राजकीय नेत्यांचा वरहदस्त आहे, अशा प्रतिष्ठानांच्या तपासणीला प्रधान्य दिले जाईल. काही दिवसांपूर्वी हॉटेल ईगल, रामगिरी, महेफिलच्या बांधकामाची तपासणी करुन दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दोन, चार हॉटेल्सची मोजणी करण्यापेक्षा शहरातील सर्वच हॉटेल, बियरबार, रिसोर्ट्सच्या बांधकामांचे मोजमाप करुन ही प्रतिष्ठाने नियमानुसार बांधण्यात आली आहेत अथवा नाही, हे तपासले जाईल. सहायक संचालक नगररचना विभागाकडे हॉटेलचे बांधकाम तपासण्याची जबाबदारी आल्यामुळे मनुष्यबळाची वानवा जाणवू लागली आहे. या विभागाची दैनंदिन कामे खोळंबल्याने नागरिकांची ओरड सुरू आहे. सोमवारपर्यंत शहरातील हॉटेल, रिसोर्ट, बियरबार, लॉजिंगच्या बांधकामाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
हॉटेल,रिसोर्टसची तपासणी होणार
By admin | Updated: July 10, 2015 00:42 IST