अमरावती : लॉकडाऊनच्या कालावधीत आवश्यकता नसतानाही एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. राज्य शासनाने जारी केलेल्या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता बसमध्ये अन्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर एसटी महामंडळाकडून होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन संदर्भातील नवीन सूचनाप्रमाणे एसटी बस प्रवासात आता हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. महामंडळाची प्रवासी सेवा बंद नाही. मात्र, मर्यादित स्वरूपात सुरू आहे. केवळ अत्यावश्यक काम असणाऱ्या लाेकांसाठीच एसटी प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. प्रवास करणाऱ्या नागरिकांनी यादी वाहकांकडून तयार केली जात आहे. नोकरदार, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी व फॅक्टरीत कामगार अत्यावश्यक कामासाठी व वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणारे नागरिक तसेच अत्यंविधीसारख्या महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना आणि अडकलेल्या परप्रांतीय कामगारांनाच बसने प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रवास करणाऱ्या प्रत्येकांचे ओळखपत्र तपासून आाणि प्रवासाचे कारण जाणून घेतल्यानंतरच प्रवाशास बसमध्ये एन्ट्री दिली जात आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळता बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे.
कोट
बाहेर ठिकाणाहून कारण नसताना एसटी बसने प्रवास करणाऱ्याच प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना यामध्ये सूट दिली जात आहे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक
एसटी महामंडळ