ईर्विन चौकात निर्दशने : भाजप सरकारविरोधात नारेबाजीअमरावती : उत्तरप्रदेशात भाजपने ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम)मध्ये घोटाळा करुन सत्ता काबीज केली आहे. ही भारतीय लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे उत्तरप्रदेशातील निकाल रद्द करुन नव्याने बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करीत रविवारी बसपाने प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी केली.स्थानिक ईर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बसपाच्यावतीने निर्दशने करण्यात आले. यावेळी महापालिकेतील बसपाचे गटनेता चेतन पवार, राज्याचे प्रभारी दादाराव उईके, प्रदेश सचिव राजीव बसवनाथे आदींच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. उत्तरप्रदेश, उत्तराखंड राज्यात ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये घोटाळा करुन भाजपने सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला. भारतीय संविधानाने सर्वांना एकमताचा अधिकार बहाल केला आहे. मग ती व्यक्ती राष्ट्रपती, पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री. मात्र, भाजप सरकारने ‘ईव्हीएम’ मध्ये प्रचंड घोटाळा केला. बटन कोणतेही दाबा, मते भाजपला असे तांत्रिक सेटींग करुन लोकशाहीची हत्या केली, असा आरोप बसपाने केला. उत्तरप्रदेशात दलित, मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत. हे मतदार परंपरागत भाजपविरोधी असताना दलित, मुस्लिमांची मते देखील भाजप उमेदवारांना कसे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. उत्तरप्रदेशातील निवडणूक ही ‘ईव्हीएम’ मध्ये मॅनेज करण्यात आली असून जुन्या बॅलेट प्रणालीने ही निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. ‘ईव्हीएम’ मशीन ही प्रणाली पूर्णत: बंद करण्याची मागणी देखील बसपाने केली. यावेळी नगरसेविका माला देवकर, नगरसेवक ़ऋषी खत्री, माजी नगरसेवक दीपक पाटील, मंगेश मनोहरे, सुदाम बोरकर, सुधाकर मोहोड, अनंत लांजेवार, याह्या खान पठाण, निळा भालेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बसपातर्फे ‘ईव्हीएम’ची होळी
By admin | Updated: March 13, 2017 00:09 IST