येवदा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
येवदा : परिसरात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊ, हजेरी लावत आहे. या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने परिसरामधील लोकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. येवदा येथील गोपाल मानकर, रवींद्र मानकर, पडघामोळ यांच्या पोल्ट्री फार्मवरचे शेड उडून गेले. जिवंत पक्षीसुद्धा सैरभैर झाले. यात त्यांचे जवळपास दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. प्रल्हाद किसनराव चोरे यांच्या शेतामधील पाच लाखांची सौरऊर्जा यंत्रणा वादळाने उडून गेली. संग्रामसिंह ठाकूर यांच्या गोडाऊनवरचे टिन पत्रे उडून गेले. त्यांचेसुद्धा दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. अनेक जुन्या वृक्षांची पडझड झाल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. हवेमुळे विद्युत तारा तुटून परिसरातील वीज खंडित झाली. महावितरणचे सहायक अभियंता कपिल कोकणे यांच्या मार्गदर्शनात विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने पाहणी करून वीजपुरवठा सुरळीत चालू केला. येवदा येथे झालेल्या नुकसानाची महसूलचे अधिकारी गौरव सुरपाटणे, कल्पना कासरकर, शिल्पा रायबोले तसेच कृषी विभागाचे वासुदेव भोई यांनी तातडीने पाहणी करून पंचनामे तयार केले व शासनाकडे अहवाल सादर केला. शासनाने नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.