अमरावती : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा गटामधील विविध संवर्गातील १९३ अधिकारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने आरोग्यसेवेवर परिणाम व कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे.
सध्या राज्यात कोरोना साथरोगाने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग, त्यासोबतच नजीकच्या कालावधीत तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोग्य विभागाला गरज लक्षात घेता, आरोग्य विभागाने महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ पदावरील अधिकारी तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कोविडच्या पार्श्वभूमीवर याआधीच वाढविण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व अन्य कामगार विमा रुग्णालये यांमधून रुग्णांना आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यात येतात. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षांपर्यंत वाढविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय ३१ मे २०१८ पासून पाच वर्षांसाठी म्हणजे ३१ मे २०२३ पर्यंत लागू करण्यात आला आहे.