प्रभारींची दमछाक : अनेक वर्षांपासून पदे रिक्तभंडारा : जिल्हा आरोग्य व हिवताप विभागात अनेक वर्षांपासून महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे हे विभाग 'प्र'भारींच्या भरोशावर सुरू आहे. आरोग्य विभागाचा एक डॉक्टर तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्याची पदे सांभाळत असल्याने त्यांची 'सर्कस' होत असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाची जिल्हा स्तरावरचे पाच महत्वपूर्ण पदे रिक्त आहेत. जिल्हा हिवताप विभागातही अनेक पदे रिक्त आहेत. हेल्थ विभागातील महत्वाची पदे रिक्त असल्याने त्याची जबाबदारी प्रभारी अधिकारी सांभाळत असल्याने सध्या हे दोन्ही विभाग 'डायलेशिस'वर असल्याची प्रचिती येत आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. विजय डोईफोडे कार्यरत आहेत. त्यांच्या अधिनस्थ अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी वर्ग एक, प्रशासकीय अधिकारी वर्ग दोन, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी वर्ग दोन, सांखिकी अधिकारी वर्ग दोन, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी व भंडारा तालुका आरोग्य अधिकारी यांचे पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तर जिल्हा हिवताप कार्यालयातही काही वेगळी परिस्थिती नाही. हिवताप विभागाचे सेनापती असलेल्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या विभागात ६६ महत्वाची पदे रिक्त आहे.डॉ. प्रशांत उईके यांच्याकडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रभार आहे. डॉ. उईके यांची नियुक्ती जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे आजमितीस चार पदांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. डॉ. उईके यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पहेलाचे वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने या रिक्त पदांची भरती करण्याऐवजी त्यावर प्रभारींची नियुक्ती करून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचेच दिसून येत आहे.कक्षाधिकारी असलेले के. आर. खोब्रागडे यांच्याकडे प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. प्रशासकीय अधिकारी संवर्गाचे पद मागील ८ ते ९ वर्षांपासून रिक्त आहे. सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद सुमारे पाच वर्षांपासून भरले नसल्याने त्याच्या अतिरिक्त पदासाठी आरोग्य विभागाकडे आता कर्मचारी उपलब्ध नसल्याने हे महत्वाचे पद रामभरोसे आहे. सांखिकी अधिकाऱ्याचे पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या पदावर डी. बी. चाफले हे अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी पद सुमारे १५ वर्षांपासून रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पदावर आरोग्य विभागाने 'जुगाड'तंत्राचा वापर केला आहे. या पदावर आरोग्य शिक्षण पदविकाधारक असलेले एन. पी. नागपूरकर यांची नियुक्ती नाही तर प्रतिनियुक्ती करून नवा अध्याय जोडला आहे. नागपूरकर हे अवैद्यकीय पर्यवेक्षक असून त्यांची नियुक्ती नागपूर येथे करण्यात आली आहे. मात्र आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात प्रभारींचा भरणा झाला असल्याने जिल्ह्यात आता सक्षम अधिकारी व कर्मचारी उरले नाहीत. त्यामुळे नागपूरकर यांची नियुक्ती नागपूरला झाली असतानाही त्यांना भंडारा येथे प्रतिनियुक्तीवर रूजु करून घेतले आहे. यासोबतच आरोग्य विभागात अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, तालुका अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र परिचर आदी महत्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून अनेकांवर याची अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागत आहे. प्रशासकीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, सांखिकी अधिकारी, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी ही महत्वाची पदे मागील अनेक वर्षांपासून प्रभारींच्या भरोशावर सोडून आरोग्य विभाग जबाबदारी सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
आरोग्य विभाग ‘डायलेसिस’वर
By admin | Updated: November 12, 2014 22:37 IST