परतवाडा : अचलपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती राजेंद्र लोहिया यांनी सफाई जमादार कैलास वानखडे यांना रविवारी दुपारी ३ वाजता जीवनपुरा येथे शिवीगाळ करीत मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी लोहिया यांच्याविरूद्ध अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी पालिकेतील संपूर्ण सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. अचलपूर शहरातील जीवनपुरा येथे बालाजी संस्थानच्यावतीने दरवर्षी लोटांगण यात्रा आयोजित केली जाते. त्यासाठी स्वच्छतेकरिता पालिकेतील कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सहा वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत सफाई जमादार कैलास नत्थुजी वानखडे यांनी परिसराची साफसफाई कर्मचाऱ्यांकडून करून घेतली. त्यानंतर आरोग्य सभापती राजेंद्र लोहिया तेथे आले आणि त्यांनी कैलास वानखडे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे विमल कैलास वानखडे उशिरा रात्री पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आरोग्य सभापतींची सफाई जमादाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 01:24 IST