अमरावती : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे, तर एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश अचानक धडकल्याने अभियानातील कर्मचार्यांच्या चितेंत पडले आहे. विशेष म्हणजे ऐन कोरोनाच्या संकटकाळात थेट आदेश धडकल्याने मिनीमंत्रालयात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
गत काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असतानाच राष्ट्रीय ग्रामीण मिशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यावर होत असलेल्या कारवाईमुळे राजकीय शह-काटशहाचे राजकारण रंगत आहे. एनआरएचएमचे जिल्हा व्यवस्थापक अशोक कोठारी यांची पुणे येथे बदली करण्यात आली, तर यापूर्वी याच अभियानातील जिल्हा सनियंत्रण अधिकारी असलेल्या प्रफुल्ल रिधोरे यांची गत आठवड्यात सेवा समाप्त करण्यात आली. यानंतर दोनच दिवसांपूर्वी जिल्हा आशा समन्वयक शशिकांत सभाने यांची सुद्धा सेवा समाप्तीचा आदेश धडकले. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना आरोग्य मिशनमधील अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीचे सत्र सध्या सुरू आहे. अशातच आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हा व्यवस्थापक अशोक कोठारी यांची समकक्ष पदावर पुण्यात बदली केल्यानंतर या पदावर वर्णी लावण्यासाठी जोरदार लाॅबिंग सुरू झाले आहे. या आरोग्य अभियानाला केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, यावर मिनीमंत्रालयातील पदाधिकाऱ्यांचेही पाहिजे तसे नियंत्रण नाही. त्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग लावले आहेत. यातही राजकीय दबाब तंत्राचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.