दोन हजार रूपयांची लाच : जेवडनगरमध्ये कारवाईअमरावती : शालेय मध्यान्ह योजनेचा धनादेश काढून देण्याचा मोबदला म्हणून २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एका मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली. वीणा साहेबराव लव्हाळे (५३, प्रशांतनगर) असे आरोपीचे नाव असून त्या जेवडनगर येथील महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता शाळेच्या आवारातच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.याप्रकरणातील तक्रारकर्त्या या जय मातादी बचत गटाच्या सचिव असून त्यांनी महापालिका प्राथमिक शाळा, जेवडनगर येथे शालेय मध्यान्ह भोजन योजनेचे काम घेतले आहे. मार्च २०१५ मध्ये त्यांना पुरविलेल्या सेवेचा मोबदला म्हणून ७ हजार रुपयांचा धनादेश निघाला. तो देण्याकरिता मुख्याध्यापिका लव्हाळे यांनी प्रति महिना ५ हजार रूपयांप्रमाणे २ महिन्यांचे १० हजार रूपये मागितले.त्यासंदर्भात या महिलेने २१ आॅक्टोबरला लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. धनादेश जमा झाल्यानंतर लव्हाळे यांनी ७ हजार रूपयांची लाच मागितली. दरम्यान एसीबीने पडताळणी केली असता लव्हाळे यांच्याकडून लाच मागितली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे सापळा रचण्यात आला. धनादेश घेण्यासाठी ही महिला जेवडनगर येथील शाळेत गेली असता त्यांना नाईलाजास्तव पाच हजार रूपये लाच द्यावी लागली. उर्वरीत २ हजार रूपये शाळा सुरू झाल्यानंतर घेऊन येण्याचे मुख्याध्यापिकेने सांगितले होते. शुक्रवारी जेवडनगर येथील शाळेतच सापळा रचण्यात आला आणि मुख्याध्यापिका लव्हाळे यांना २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. एखाद्या मुख्याध्यापिकेने शालेय पोषण आहाराच्या संदर्भातील धनादेश देण्यासाठी स्वीकारलेली लाच शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ माजविणारी ठरली आहे. (प्रतिनिधी)
महापालिका शाळेची मुख्याध्यापिका लव्हाळे एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: November 28, 2015 01:01 IST