अमरावती : शाळेतील निर्धारित पटसंख्येचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सन २०११-१२ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थांचा शाळेत बोगस प्रवेश दाखविल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह पंधरा जणांविरुद्ध फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या दडपलेल्या प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती, हे विशेष!विलासनगर परिसरात विकास विद्यालय आहे. या विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सन २०११-१२ मध्ये संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे १३ विद्यार्थांचा शाळेत बोगस प्रवेश दाखविला. यासंदर्भाची लेखी तक्रार उपशिक्षणाधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी पुऱ्याव्यानिशी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतु पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. ही बाब निदर्शनास येताच ‘लोकमत’ने २६ आॅगस्ट रोजी ‘उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीला पोलिसांचा खो’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी याप्रकरणी चौकशी करुन तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश गाडगेनगर पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
मुख्याध्यापक, शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By admin | Updated: September 2, 2014 23:22 IST