धारणी : देशातील पहिले डीजिटल व्हिलेज हरिसाल येथे स्वातंत्र्यदिनी पोलीस व वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या चमुने दोन बोगस डॉक्टरांना अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापैकी एका डॉक्टरविरूद्ध कारवाईची ही दुसरी वेळ आहे, हे विशेष. असगर शेख व डॉक्टर बसू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरांची नावे आहेत.हरिसाल येथे तालुका आरोग्य अधिकारी एस.बी.जोगी, हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी थोरात आणि सहायक पोलीस निरीक्षक एस.पी.पवार यांनी स्वातंत्र्यदिनी बोगस डॉक्टरांविरूद्ध कार्यवाही केली. यात दोन डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्याची अधिकृत पदवी नसताना उपचार करताना पकडण्यात आले. त्यांचकडून अॅलोपॅथी उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधी, गोळया व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. उपरोक्त डॉक्टर्स अनेक दिवसांपासून हरिसाल येथे दुकाने थाटून आदिवासी रूग्णांवर उपचार करीत होते. मेळघाटात पुर्वीच कुपोषणामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे तांडव सुरु असताना त्यात अशा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याने आणखी भर पडली आहे. आता दोन डॉक्टरांविरुध्द कार्यवाही झाल्याने यावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य प्रशासनाला मदत होणार आहे. हरिसाल प्रमाणेच धारणी शहर, सुसर्दा, बिजुधावडी, बैरागड या भागातही बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. हरिसाल येथे पकडण्यात आलेल्या दोन डॉक्टरांपैकी बसू नामक डॉक्टरवर यापूर्वी सुद्धा कारवाई झाली आहे, अशी माहिती धारणीचे तालुका आरोग्य अधिकारी एस.बी.जोशी यांनी दिली.
हरिसाल येथे दोन बोगस डॉक्टर पकडले
By admin | Updated: August 16, 2016 23:55 IST