पोलिसात तक्रार : गांधी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी त्रस्त बडनेरा : बडनेऱ्यातील गांधी व कन्या महाविद्यालयाच्या समोरुन जाणाऱ्या मार्गावर रोडरोमिओचा नाटक मनस्ताप या शाळांच्या मुलींना सोसावा लागत असल्याची तक्रार दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. शेरेबाजी तसेच विचित्र अंगप्रदर्शन करीत असल्याचे यात म्हटले आहे. गांधी विद्यालय व कन्या शाळा जवळच आह. दोन्ही शाळांच्या मधात असणाऱ्या रस्त्यावर रोड रोमिओचा वावर असतो. नेमकी ज्या वेळेस शाळा भरते व सुटते त्याच वेळेस हे रोडरोमिओ शाळेसमोर किंवा या मार्गावर फिरत असतात व शाळकरी मुलींना नाहक शेरेबाजी करीत असल्याची तक्रार दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापक व परिसरातील शेकडो नागरिकांनी बडनेरा पोलीस ठाण्यात लेखी स्वरुपात दिली आहे. या पूर्वी देखील अनेकदा मौखीक स्वरुपात पोलीस ठाण्यात या ठिकाणच्या त्रासाची माहिती देण्यात आली आहे. शाळा भरतांना किंवा सुटल्यावर हे रोड रोमिओ मुलींना त्रात देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिसरवासियाना देखील याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांनी यांच्यावर तात्काळ वचक बसवावा असेही म्हटले आहे. बडनेरा पोलीस ठाण्याची सीआरओ व्हॅन काही दिवस या ठिकाणी तैनात होती. मात्र अलीकडे गाडी येथे राहत नसल्यामुळे रोडरोमिओचे चांगलेच फावत आहे. यांच्या त्रासामुळे पालकवर्ग चिंता बाळगून आहेत. शाळा भरताना किंवा सुटताना पोलिसांची सीआरओ मोबाइल गाडी या परिसरात उभी ठेवल्यास रोड रोमिओचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होवू शकतो. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत कन्या व गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह श्रीरंग बडनेरकर, जयंत भगत, सागर निंबर्ते, विक्रम लाडे, निरज शेलोकार, सूरज जोशी, सचिन यादव, विनोद मोटवानी, विशाल इंगोले, सुयश मोरे यांच्यासह बऱ्याच नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
कन्या विद्यालयासमोर सख्याहरींचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 00:23 IST