अमरावती : शासनाच्या धोरणानुसार ३ टक्के राखीव निधीतून अपंगांसाठी पुनर्वसनाच्या योजना राबवून जिल्ह्यातील अपंगांना न्याय देण्याचे पाऊ ल उचलले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी येथे बुधवारी दिली. येथील अपंग जीवन विकास संस्था व पॅरा आॅलिंम्पिक स्विमिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने बडनेरा मार्गावरील संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक अपंग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. गित्ते म्हणाले, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अत्यंत काळजीपूर्वक योजना राबवीत असून ७६ हजार अपंग असलेल्या जिल्ह्यात शासनाच्या धोरणानुसार ३ टक्के निधीमधून योजना राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. येत्या ३ महिन्यांत अपंग व्यक्तीच्या शासकीय निमशासकीय सेवेतील अनुशेष भरण्यासाठी संबंधितांची सभा घेऊन योग्य पावले उचलले जातील, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दिलीप एडतकर होते. संस्थाध्यक्ष किशोर बोरकर यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी बी.आर. चव्हाण, सुभाष गवई, प्रल्हाद गवई, बबलू देशमुख, मुन्ना राठोड, रामेश्वर अभ्यंकर, मंगेश आठवले, बापुसाहेब बेले, रामभाऊ पाटील, गोपीचंद मेश्राम, साहेबराव घोगरे, अभिनंदन पेंढारी, संतोष देशमुख, अमोल इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी अपंग जीवन विकास संस्था व केेंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार यांच्या मदतीने गरजू अपंगांना तीनचाकी सायकली व श्रवण यंत्रे जिल्हाधिकारी गित्ते यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. किशोर बोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन गित्ते यांचा सत्कार केला. संस्थेव्दारा चेतन राऊ त, पानेरी पानट, कांचनमाला पांडे, विश्वजित गुडधे, प्रेषित वानखडे, रवींद्र वानखडे यांना अपंगभूषण आणि अपंगांसाठी उल्लेखनीय कार्य करणारे गोविंद कासट, सुभाष गवई, सुधाकर पोकळे यांना अपंग मित्र पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. जागतिक अपंग दिनाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अपंग विद्यार्थी, त्यांचे पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राखीव निधीतून अपंगांसाठी पुनर्वसनाच्या योजना राबविणार
By admin | Updated: December 3, 2014 22:41 IST