संजय जेवडे नांदगाव खंडेश्वरसोयाबीन उत्पादनात यंदा कमालीची घट झाली. तालुक्यात सोयाबीनचा पेरा अधिक असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. बाजार समितीत सोयाबीनची आवक घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत ती निम्यावर आली आहे. मागील वर्षी नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सोयाबीनची १ ते दीड हजार पोत्यांची आवक रहायची. यंदा मात्र फक्त ५०० ते ७०० पोत्यांची आवक आहे. मागील वर्षी ५ नोव्हेंबरपर्यंत येथे ११ हजार ५८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यंदा याच तारखेपर्यंत फक्त ४ हजार १०० पोते सोयाबीन विक्रीस आले आहे. कित्येक शेतकऱ्यांना तर एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. या तालुक्यात ५८ हजार ५४० हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येत असून यंदा ४६ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा व १० हजार ७६ हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा आहे. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने १५ जुलैपासून उशिरा पेरणीला खरी सुरुवात झाली. जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या दडीमुळे दुबार पेरणी करावी लागली. तसेच आॅगस्ट व २ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. परिणामी उत्पादनात कमालीची घट आली आहे. या तालुक्यात तुरीचे पीकही समाधानकारक नाही. सुरुवातीच्या अतिवृष्टीमुळे बहुतेक शेतातील तुरीचे पीक जळाले व नंतरच्या पावसाच्या दडीमुळे तुरीच्या पिकांची वाढ झाली नाही. त्यामुळे तुरीच्या पिकांतही घट होणार आहे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र सरोदे, विनोद जगताप व संचालक मंडळाने केली आहे.
बाजार समितीत सोयाबीन आवक निम्म्यावर
By admin | Updated: November 6, 2014 00:49 IST