अमरावती : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना यथायोग्य मदत आणि शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर भोयर यांनी केली असून शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. निवडणूक काळात भाजपने शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून शेतकरी देखील हैराण झाला आहे. अलीकडे तर शेतकऱ्यांवर आसमानी संकटे एका मागोमाग एक कोसळत आहेत. सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबीचे पीक हातचे गेले आहे. असे असूनही शासनाद्ववारे शेतकरी हितार्थ कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. आघाडी तसेच भाजप सरकारच्या काळात शेतमालाच्या भावात असलेली तफावत शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक त्रासदायक ठरत आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान भाजप शासनाने शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी दिलेल्या आर्थिक घोषणांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणीदेखील शेखर भोयर यांनी केली आहे. या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. टोलनाके बंद करण्याबाबतही शासनाने भूमिका स्पष्ट करावी, असेदेखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गारपीटग्रस्तांना हवा मदतीचा हात
By admin | Updated: March 17, 2015 01:28 IST