अमरावती : प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम दरवर्षी जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडतो. या कार्यक्रमाचे नागरिकांना आकर्षण असते. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यास नागरिकांची मोठी गर्दी उसळते. त्याचप्रमाणे माध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकारही वृत्त संकलनासाठी जिल्हा स्टेडियमवर उपस्थित असतात. मात्र, मंगळवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना छायाचित्रे घेण्यासाठी ज्या स्थळी जाणे आवश्यकच आहे तेथे न जाण्याचे फर्मान पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सोडल्याने पालकमंत्र्यांची ध्वजवंदना व परेड निरिक्षणाची छायाचित्रेच माध्यमांना काढता आली नाही. पोलीस उपायुक्तांचे हे अजब फर्मान पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी वृत्त छायाचित्रकारांपर्यंत 'त्यांच्या शैलीत' पोहोचविल्यानंतर सर्व छायाचित्रकारांनी आहे तेथेच बसून या आदेशाचा निषेध नोंदविला. यासंदर्भात पालकमंत्री, गृहराज्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना तक्रार देण्याचा मानस छायाचित्रकारांचा आहे.जिल्हा क्रीडा संकुलातील ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित राहात असल्यामुळे येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो. मेटल डिटेक्टरने प्रत्येकाची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो. माध्यमांना या कार्यक्रमांचे निमंत्रण असते.
पालकमंत्र्यांसमोर जाल, तर खबरदार!
By admin | Updated: January 28, 2016 00:21 IST