मोर्शी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या घरकुलधारकांना उर्वरित रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. तद्वतच घरकुल लाभार्थींची अतिक्रमण प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष रवि मेटकर यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे लेखी निवेदन पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
सन २०१७ पासून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोर्शी शहरामध्ये घरकुल योजना लागू करण्यात आली. परंतु, चार वर्ष होऊनही या योजनेमध्ये समाविष्ट घरकुलधारकांना अद्याप लाभ देण्यात आला नाही. या योजनेत प्रथमत: ९६३ पैकी ५४३ लाभार्थींना घरकुल वितरित करण्यात आले. यादरम्यान ज्या घरकुल लाभार्थींना घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात आले, त्या लाभार्थींनी आपली घरे बांधून तयार केली. मात्र, अद्यापही त्यांना पूर्ण रक्कम अदा करण्यात आली नाही. ज्या लाभार्थींच्या घराचे संपूर्ण बांधकाम झाले, अशा लाभार्थींना पंधरा दिवसांच्या आत उर्वरित रक्कम वितरित करण्यात यावी. तद्वतच लाभार्थींचे अतिक्रमणाचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून दोन वर्षांपासून वंचित असलेल्या घरकुल लाभार्थींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रवि मेटकर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम, गटनेता तथा नगरसेवक नितीन राऊत, मनोहर शेंडे, महिला व बाल कल्याण सभापती सुनीता कोहळे, छाया ढोले, प्रीती ब्रह्मानंद देशमुख यांनी केली आहे.