अंजनगाव सुर्जी : पुरवठा विभागाकडून बायोमेट्रिक ‘पॉस’ या प्रणालीने रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य वितरित केले जाते. परंतु, मार्चमध्ये १५ दिवसांपासून पॉस मशीन बंद असल्याने अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत, तर अनेक कार्डधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्चचे स्वस्त धान्य त्वरित दयावे, अशी मागणी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्याकडे करण्यात आली आहे.
पॉस मशीनवर संबंधित ग्राहकाचा थम्ब घेतला जातो. त्यानंतर त्यातून कागदी बिल बाहेर पडते. तोपर्यंत धान्य वितरण केले जात नाही. मात्र, पॉसवर थम्ब घेण्यात तांत्रिक अडचण उद्भवली असल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांचे म्हणणे आहे. या तांत्रिक समस्येमुळे अनेक रेशन कार्डधारकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. कोरोनाकाळात आधीच हाताला काम नसल्याने रेशन आणण्यासाठीही पैसे नाहीत, अशी अनेकांची स्थिती आहे. त्यात पैशांची जुळवाजुळव केल्यानंतरही दुकानातून रेशनविना परतावे लागत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे.