आंदोलन : बच्चू कडूंनी वेधले सीईओंचे लक्षअमरावती : जिल्हाभरातील ग्रामपंचायतीमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आ. बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना भेटून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. ग्र्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि वेतनश्रेणी लागू करावी, ग्रामपंचायतमध्ये दहा वर्षापेक्षा कमी कालावधीत असलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी नियम लागू करावा, सुधारित वेतनश्रेणीची अधिसूचना जाहीर करावी, ग्रामपंचायतमध्ये सेवा काळात मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यात यावे.१ एप्रिल २०१६ च्या निर्णयान्वये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अपघात विमा लागू करावा, दिपक म्हैसकर समितीच्या अहवालाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, १९८१ च्या आधारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे केली.यावेळी धनंजय गुरखंडे, अविनाश भोगे, ज्योती शिंगारे, दिनेश वानखडे, नीलेश कडू, मनोहर उईके, शंकर जावरकर, नारायण पाचघरे, उमेश भोंडके, प्रल्हाद कळसकर आदींसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
ग्रा.पं. कर्मचारी रस्त्यावर
By admin | Updated: August 2, 2016 00:16 IST