समर्थनार्थ एकवटले होते अमरावतीकर : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर अमरावती : आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेवर सरत्या वर्षी चंद्रकांत गुडेवार या कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांच्या सकारात्मक उर्जेचा प्रभाव राहिला. १३ महिन्यांच्या अल्प कालावधीत त्यांनी अमरावतीकरांच्या हृद्यात स्थान मिळविले आणि अमरावतीचा चेहरामोहरा पालटविण्यात मौलिक सहभाग दिला. सरत्या वर्षात घडलेल्या घटनांचे सिंहावलोकन करताना गुडेवारांची वादळी कारकिर्द, बदली आणि ती बदली रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या अमरावतीकरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. १४ एप्रिल २०१५ ला महापालिका आयुक्तपदाची धुरा घेणारे गुडेवारांनी आयुक्त कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. अतिक्रमण आणि अवैध बांधकामधारकांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या गुडेवारांनी महापालिकेतील टक्केवारीच्या बजबजपुरीला लगाम घातला. ते कधीही राजकीय आडोशाला गेले नाहीत. म्हणूनच अल्पावधीत स्थानिक राजकारणाला ते बळी पडले. मात्र महापालिकेला आयुक्त असतो आणि त्याला अधिकारही असतात, हे गुडेवारांनी दाखवून दिले. अशातच नागपूरच्या विधीवर्तुळात खास स्थान ठेवणाऱ्या व्यक्तीने गुडेवारांची बदली घडवून आणली. गुडेवारांच्या बदलीचे आदेश १६ मे रोजी निघालेत. तत्पुर्वीच त्यांच्या आकस्मिक बदलीचे वारे महापालिकेत घोंगावू लागले होते. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी, यासाठी ज्येष्ट नगरसेवक प्रदीप बाजड यांनी पुढाकार घेतला. सर्वपक्षीय नगरसेवक त्यासाठी एकत्र आले. राजकमल चौकात स्वाक्षरी अभियान राबविले गेले. प्रातिनिधिक स्वरुपात झालेल्या या आंदोलनाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. गुडेवार यांची बदली रदद करण्याच्या मागणीसाठी १० पेक्षा अधिक नगरसेवकांना कारागृहात जावे लागले. खमक्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या मागे अमरावतीकर जिद्दीने उभे राहिल्याचे ते द्योतक होते. महापालिकेचा विचार करता संपूर्ण वर्षावर गुडेवारांचा प्रभाव राहिला.
सरत्या वर्षावर गुडेवारांचा प्रभाव
By admin | Updated: December 29, 2016 01:49 IST