दुर्लक्ष : जिल्ह्यात ११५८ वाहने नोंदणीकृत, नियमित तपासणी गरजेची वैभव बाबरेकर अमरावती शहरात काही खासगी वाहनांवर ‘भारत सरकार व महाराष्ट्र शासन सेवार्थ’ असे अंकित असून ही वाहने शहरात सर्रास फिरत आहेत. शासकीय उपयोगाच्या नावावर या वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, वाहनांच्या तपासणीकडे आरटीओ व पोलीस विभाग दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यात १ हजार १५८ नोंदणीकृत शासकीय वाहने असून विविध शासकीय विभागांद्वारे कंत्राटी पद्धतीने सुद्धा अतिरिक्त वाहने भाडेतत्त्वावर घेतली जातात. मात्र या वाहनांचा वापर हा शासकीय कामकाजासाठी केला जात असल्यामुळे त्या वाहनांवर ‘भारत सरकार व महाराष्ट्र शासन सेवार्थ’ असे अंकित केले जाते. भाडेतत्त्वावरील ही वाहने आठवड्यातून पाच दिवस शासकीय कामकाजासाठी उपयोगात आणली जात असली तरी उर्वरित दोन दिवस ही वाहने खासगी कामांसाठी वापरली जातात. वास्तविक खासगी कामांसाठी वापरली जात असताना यावाहनांवरील ‘शासकीय सेवार्थ’ चे फलक काढणे अत्यावश्यक असते. मात्र, ही खासगी वाहने या फलकांसह तशीच फिरताना आढळतात. सुटीच्या दिवशीही ही वाहने शहरात अनेक ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आले आहे. हा गंभीर प्रकार अनेक दिवसांपासून शहरात सुरु आहे. शहरातील पानटपऱ्या, हॉटेल अॅन्ड बार , निर्जनस्थळे, व्यापारी प्रतिष्ठाने आदींसमोर ही ‘शासकीय सेवार्थ’ अंकित वाहने आढळून आली आहेत. शासकीय वापरासाठी भाड्याने घेतलेल्या वाहनांचा खासगी कामांसाठी वापर होत असताना गैरप्रकाराची शक्यता नाकारता येत नाही. खेदाची बाब म्हणजे ‘शासकीय सेवार्थ’असे अंकित असल्याने या वाहनांच्या तपासणीचे धारिष्ट्य पोलीस किंवा आरटीओ विभाग कधीच दाखवित नाही. त्यामुळे अशा वाहनांमधून गैरप्रकारांची शक्यता अधिक गडद झाली आहे. नोटांचे व्यवहार, तस्करी, अवैध धंदे, आतंकवादी कृत्ये आदींसाठी वाहनांचा वापर होण्याची शक्यता आहे. शासकीय सेवार्थ अंकित वाहनांची नियमित तपासणी न करता विशेष ड्राईव्ह घेऊन तपासणी केली जाते. जर खासगी वाहनांचा असा गैरवापर होत असेल तर त्या वाहनांची तपासणी करून कारवाई केली जाईल. - श्रीपाद वाडेकर, आरटीओ अधिकारी.
शासकीय सेवार्थ वाहनांचा गैरवापर ?
By admin | Updated: January 4, 2017 00:14 IST