कायापालट : लोणी, प्रल्हादपूर, रिद्धपूरचा समावेश अमरावती : जिल्ह्यातील तीन तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंगळवार १४ मार्च रोजी शासनाने मंजुरी दिली. त्यामध्ये श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी तीर्थक्षेत्र विकासासाठी ६ कोटी ६९ लाख रूपये, तर श्रीसंत गुलाबराव महाराज भक्तीधाम प्रल्हादपूर चांदूरबाजारसाठी २४.९९ कोटी रुपये व मोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील तीर्थक्षत्र विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. या बैठकीला महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार बच्चू कडू जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपस्थित होते.चांदूरबाजार तालुक्यातील प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज भक्तीधाम प्रल्हादपूरसाठी २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या विकास आराखड्यामधून सांस्कृतिक भवन, सायंस सेंटर, भक्त निवास, गोरक्षण, विश्रामगृह, मुख्य प्रवेशव्दार, बगिचा, थेटर व वाचनालय तसेच स्टेज व मंदिराची सुधारणा यासह एकूण १८ कामांचा समावेश राहणार आहे.महानुभावपंथांची काशी म्हणून ओळख असलेल्या रिद्धपूर तीर्थक्षेत्रासाठी २५ कोटींचा विकास आराखडा असणार आहे. यामध्ये बसस्थानक ते मुख्यप्रवेशवदार रस्त्याचे काम, सिमेंट काँक्रिट रस्ता, शासकीय खुल्या भूखंडाकरिता फेन्सिंग, पुरूष व महिला प्रसाधनगृह थिम पार्क, पाण्याची टाकी, शॉपिंग कॉम्ल्पेक्स, बाग, पार्किंगची व्यवस्था, डायनिंग हॉल, बोटिंगची सोय, बाजारओटे यासह घनकचरा व्यवस्थापन यांचा समावेश असणार आहे.नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील लोणी येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ६ कोटी ६९ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, बहुउद्देशीय सभागृह, सत्संग भवन, श्री संत गुलाबराव महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराची सुधारणा व सुशोभिकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे क्राँक्रिटीकरण सुधारणा आदी कामे मार्गी लागणार आहेत. शासनाने जिल्ह्यातील तीन विकास आराखडयास मंजुरी दिल्यामुळे या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे. (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शासनाची मंजुरी
By admin | Updated: March 15, 2017 00:02 IST