लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रूक्मिणीच्या पायदळ पालखीचे येथील बियाणी चौकात बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आगमन होणार आहे. यंदा पालखीचे ४२४ वर्षे आहे. शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्रमंडळाने केले आहे. देवी रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून उत्साहात १७ जून रोजी पायी दिंडीने पंढरपूरसाठी प्रस्थान केले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक पालखीला निरोप देण्यास कौंडण्यपूरच्या शिवेपर्यंत सोबत होते.पंढरपूरला आषाढी एकादशीला जाणाºया दिंडीपैकी कौंडण्यपूरची दिंडी सर्वात प्राचीन आहे. २७ जुलै रोजी ही पालखी पंढरपूरला पोहचेल. सन १५५४ पासून अव्याहतपणे सुरू असलेली ही राज्यातील एकमेव पालखी आहे.बुधवारी मार्डीमार्गे पालखी जिप सदस्य अभिजित बोके यांच्या घरी येईल. सायंकाळी ५ च्या सुमारास पालखीचे बियाणी चौकात आगमन होणार आहे. यावेळी भव्य आतषबाजी, टाळ- मृदंगाच्या गजरात व विठूरायांच्या जयघोषात पालकीचे स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणी आ. यशोमती ठाकूर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर व प्रशासनाचे अधिकारी पालखीचे पूजन करणार आहेत. या स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. यशोमती ठाकूर व मित्रमंडळाने केले आहे.राज्यात सर्वात प्राचीन व ४२४ वर्षांची परंपरा लाभलेली आई रुक्मिणीची ही पालखी आहे. पंढरपूरला या पालखीला विशेष मान आहे. अनादी काळापासून ही परंपरा सुरू आहे. संस्कृतीचे जतन करण्याचे महत्कार्य आपण सर्वांनी केले पाहिजे.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा
देवी रुक्मिणीची पालखी आज आई अंबेच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:27 IST
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रूक्मिणीच्या पायदळ पालखीचे येथील बियाणी चौकात बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आगमन होणार आहे.
देवी रुक्मिणीची पालखी आज आई अंबेच्या भेटीला
ठळक मुद्दे४२४ वर्षांची परंपरा