जितेंद्र दखने
अमरावती : कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. खासगी कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने लाखो लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळेच स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात राेजगार मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली. गत वर्षभरात जिल्ह्यात ११ हजार ८१४ जणांनी रोजगारांसाठी नोंदणी केली आहे. अशातच जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यांमध्ये ४०९ जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात नांदगाव पेठ एमआयडीसीमधील विविध कंपन्या, हॉस्पिटल, मॉलसह औरंगाबाद, पुणे या ठिकाणच्याही कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वयंरोजगार केंद्राकडून कोरोनाकाळात ऑनलाईन रोजगार मेळावे वेळोवेळी घेण्यात आले. यामुळे ४०९ जणांना रोजगारदेखील उपलब्ध झाला आहे. कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून सर्वच उद्योग, व्यवसायांची घडी विस्कळीत झाली आहे. यामुळेच लाखो लोकांना बेरोजगार होण्याची वेळ आली. परंतु, जिल्हा स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने या बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यासह बाहेर ठिकाणी रोजगाराची संधी असल्यास कळविण्यात येते. वेळोवेळी मेळावे घेऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामुळेच आठ महिन्यांमध्ये जिल्ह्यात ४०९ जणांना रोजगार मिळाला आहे.
बॉक्स
अनेकांनी पकडली पुणे, मुंबईची वाट
जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संधी मिळतात. पण, त्या फारशा नाहीत. त्यामुळे अनेक बेरोजगार पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी विविध कंपन्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने जातात. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. याशिवाय उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणात कुशल कारागीर लागतात.
कोट
बेरोजगार तरुण-तरुणीसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दरमहा मागणी व रिक्त जागा लक्षात घेऊन वेळोवेळी रोजगार मेळावे घेतले जातात. गत वर्षभरात कोरोना संसर्गामुळे रोजगार मेळावे ऑनलाईन घेऊन ४०९ जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- प्रफुल्ल शेळके, आयुक्त, कौशल्य विकास राेजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
बॉक़्स
कोणत्या वर्षात किती नोंदणी?
२०१५-२४१३२
२०१६-१२८५३
२०१७-११००३
२०१८-१४४२१
२०१९-१८७०१
२०२०-११८१४
बॉक़्स
कोणत्या महिन्यात किती नोंदणी
जानेवारी ३१२-९१
फेब्रुवारी २५९-८९
मार्च १८६-११६
एप्रिल ३३९-१०६
मे १३४-७८
जून २४६-११०
जुलै ४१६-२१६
ऑगस्ट ५७१-१६५
बॉक़्स
गतवर्षभरात ३५९३ जणांना रोजगार
स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात राेजगारासाठी सन २०२० या वर्षात ११ हजार ८१४ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी वर्षभरात ३ हजार ५९३ जणांना कौशल्य विकास केंद्राद्वारे नांदगाव पेठ एमआयडीसह मॉल, हॉस्पिटल, हॉटेल व पुणे, औरंगाबाद येथील विविध कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशातच जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ४०९ जणांना रोजगार मिळाला आहे.