पालकमंत्री : डॉ.पंजाबराव देशमुख प्रशिक्षण सभागृहात आयोजनअमरावती : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या विशेषत: आत्महत्याग्रस्त भागाकरिता सवोर्तोपरी सहाय्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. अमरावती जिल्ह्यात स्थापित झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेला माल सहजपणे विकता यावा, मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषक प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात जागतिक बँक, आत्माच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व त्याअंतर्गत स्थापित शेतकरी गटांसाठीच्या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहसंचालक सु.रा. सरदार होते. नाबार्डचे पवणीकर, वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद घन, माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले आदी उपस्थित होते.यावेळी ना. पोटे म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याने मोठे होण्याचे स्वप्न निश्चित पहावे. शेतकरी आपल्या पायावर उभा झालाच पाहिजे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेले उद्योग आहे. संघर्षातूनच माणूस मोठा होतो, असे सांगून ते म्हणाले, सीड्स कंपन्यांनी मागील काळात शेतकऱ्यांची फसवणूक केली. बीज उत्पादन प्रक्रिया उद्योगात मोठा वाव आहे. फुड प्रोसेसिंगची नेमकी प्रक्रिया समजून घ्यावी त्याचा पुर्ण अभ्यास करुन प्रकल्प सुरू करावा. उद्योग उभारण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. जिल्ह्यात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्र्यांनी कार्यशाळेत सांगितले.प्रारंभी कृषी सहसंचालक सु.रा.सरदार, माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले, आत्मा चे प्रकल्प संचालक रवीन्द्र जाधव यांनी जागतिक बँक अर्थसाहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्ष्म कृषि विकास प्रकल्पा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व स्थापन झालेल्या गटांची माहिती दिली. आत्मा चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाबतीवाले म्हणाले, जिल्ह्यात ३३०० जादा गट स्थापन असून ५४००० शेतकरी या गटाशी जोडल्या गेले आहेत.१२०० गट आत्मा तुन कमी केले आहेत. १२०० फाईल्स अद्यावत करण्यात आले आहेत.५४ गटांनी प्रत्यक्ष व्यवसायाला सुरूवात केली आहे. (प्रतिनिधी)
शेती उत्पादक कंपन्यांना एमआयडीसीमध्ये जागा देणार
By admin | Updated: January 28, 2016 00:14 IST