अमरावती : भरचौकात मुलीचा हात पकडणाऱ्या दोन युवकांना जागरूक नागरिकांनी सोमवारी रात्री ९ च्या सुमारास राजकमल चौकात बेदम चोप दिला. त्यानंतर टवाळखोरांना सिटी कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दोघांनाही अटक केली. अय्याज मोहम्मद ताज मोहम्मद (२४) व वजीज खान महेमुद खान (२४) दोन्ही राहणार रतनगंज अशी आरोपींची नावे आहेत. अंबापेठ येथील रहिवासी महेश लक्ष्मण साहू (५४) मित्रासोबत दुचाकीने राजकमल चौकातून जात होते. दरम्यान दुचाकीस्वार आरोपींनी पादचारी मुलींचा हात पकडला. ही बाब लक्षात येताच साहू यांनी त्या युवकांना हटकले. आरोपींनी महेश यांना शिवीगाळ करीत त्यांच्याजवळील १६ ग्रॅमचा सोन्याचा गोफ व १८ ग्रॅमचे ब्रॉसलेट हिसकावून घेतले. नागरिक धावले. आरोपींना चोप दिला. त्यापैकी एक आरोपी पसार झाला होता. दुसऱ्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलीस ठाण्यामध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. उशिरा रात्री महेश साहू यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३९२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
भरचौकात पकडला मुलीचा हात
By admin | Updated: March 25, 2015 00:10 IST