अंजनगाव सुर्जी : स्थानिक दर्यापूर मार्गावरील एमआयडीसीस्थित अल उमर या जिनिंग युनिटच्या मालकाने अकोट येथील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कापूस घेऊन त्यांना धनादेश दिले. मात्र ते धनादेश वटले नाहीत. विचारणा केली असता ‘पैसे मांगे तो काट डालुंगा’ अशी धमकी देण्यात आली. अंजनगाव सुर्जी बाजार समितीमध्ये तक्रार प्राप्त होताच संचालक मंडळाने पुढाकार घेऊन स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदविली.
माहितीनुसार, उपरोक्त जिनिंग मालकाने गतवर्षीसुद्धा अशीच फसवणूक होते. पण बाजार समितीने त्याचे लायसन्स रद्द करण्याची तंबी देताच त्यातील १२ लाखांपैकी ११ लाख रुपये हळूहळू परत केले. एक लाख रुपये देणे बाकी आहेत. तशाच प्रकारची फसवणूक त्याने यंदा पुन्हा केली आहे.
अकोट तालुक्यातील शेतकरी मालती घोडेस्वार, मनोज घुमे व पुरुषोत्तम मोहोकार यांचे प्रत्येकी दोन लाख व मतीन खान यांचे ४ लाख याप्रमाणे एकूण १० लाखांचेवर फसवणूक केल्याचा प्रकार यंदा उघड झाला. स्थानिक बाजार समितीचे वांधा कमिटीमध्ये सदर व्यापाऱ्याला वाद मिटविण्याची संधी देऊनसुद्धा तो आला नाही. बाजार समिती सचिव गजानन नवघरे, संचालक गजानन दुधाट, सुधीर अढाऊ, शेख रहीम, प्रदीप गोमासेसह पीडित शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.