विद्यार्थिनी जळीत प्रकरण : सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्षअमरावती : गाडगेनगर परिसरातील संजीवनी कॉलनीत घडलेल्या सिलिंडर भडक्याची घटना नळीतील लिकेजमुळेच घडल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. आठ दिवसांपूर्वी सिलिंडरच्या भडक्याने दोन विद्यार्थिनी गंभीर भाजल्या होत्या. या अपघातात रिना ठाकरे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मागील पंधरवड्यात सिलिंडरच्या भडक्याच्या तीन घटना घडल्या आहेत. गॅस वितरकांनी ग्राहकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशाप्रकारच्या घटना वाढल्याचे निदर्शनास येत आहे. आठ दिवसांपूर्वी संजीवनी कॉलनीत झामरे यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या दोन विद्यार्थिनी सिलिंडरचा भडका उडाल्याने भाजल्या होत्या. १० जानेवारी रोजी संजीवनी कॉलनीत ही घटना घडली होती. या भडक्याने रिना अशोक ठाकरे (२२ रा. साऊर, भातकुली) ही ४१ टक्के तर पूनम भय्यासाहेब विधळे (२२) ही ३० टक्के भाजली होती. दोघींवरही इर्विनमध्ये उपचार सुरु होता. मात्र, रिना ठाकरेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गॅस शेगडी पेटवित असताना अचानक सिलिंडरचा भडका उडाल्याने ही घटना घडली होती. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जळीत नोंदवहीत नोंद केली. पोलिसांनी आग लागल्याचे कारण शोधून काढले असता या विद्यार्थिनीचा घरातील गॅस शेगडी ही जमिनीवर ठेवली होती तर सिलिंडरचा व्हॉल्व्ह वरच्या दिशेने होता. शिवाय नळीला ओरखडे गेले होते .त्यातून गॅस लिकेज झाल्यानेच शेगडी पेटविताच सिलिंडरचा भडका उडाला, असा निष्कर्ष पोेलिसांनी काढला आहे. गॅस सिलिंडर पेटण्यामागचे कारण शोधले असता गॅस नळी लिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गॅस पेटविताच भडका उडाला आणि दोघीही भाजल्या. - के.एम.पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे.
सिलिंडर नळीतील गॅस गळतीमुळेच उडाला भडका
By admin | Updated: January 23, 2017 00:06 IST