अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. रन-वे बांधकाम, अप्रॉन जीएसई, एटीएस टॉवर, रस्ते निर्मिती आदी प्रलंबित आणि रखडलेली कामे वेगाने सुरू होतील. याकरिता निधी कमी पडू देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना दिले.
बेलाेरा विमानतळाचा विकास त्वरेने व्हावा, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच अर्थसंकल्पात बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला. बेलाेरा विमानतळाचे विकासकाम ऑक्टाेबर २०२० पासून प्रलंबित आहेत. त्यानंतर डिसेंबर २०२० पासून सुरू झाले. मात्र, निधीअभावी मध्यंतरी विमानतळाची कामे रखडली आहेत. तथापि, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गत काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात बजेटच्या अनुषंगाने पार पडलेल्या आढावा बैठकीत बेलाेरा विमानतळाच्या विकासाचा मुद्दा रेटून धरला. निधीअभावी विमानतळाची कामे खोळंबू नये, असे पालकमंत्र्यांनी ना. अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. आता अर्थसंकल्पात बेलोरा विमानतळाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. आवश्यक निधी दिला जाईल, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता गत १० वर्षांपासून विमानतळाचे रेंगाळलेले विस्तारीकरण लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.
----------------
- विमानतळाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम
-टर्मिनस बिल्डिंगची उभारणी
- रन-वे निर्मिती, टॉप लेअर डांबरीकरण
-सर्व्हिलन्स बिल्डिंग
- एटीएस टॉवरची उभारणी
-फायर टेंडर, विद्युत कामे
- उच्च दाब वाहिनीचे कामे
- विमानतळ परिसरातील जमिनीचे सपाटीकरण
- सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याची निर्मिती
-वाहनतळाची निर्मिती
- सिव्हील कामे
-----------------
आघाडी सरकारच्या काळातच होणार ‘टेक ऑफ’
बेलोरा विमानतळाची रेंगाळलेली विकासकामे येत्या काळात पूर्णत्वास जाणार आहे. त्याअनुषंगाने निधी मिळणार असून, प्रलंबित कामे त्वरेने सुरू करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. विमानांच्या टेक ऑफसाठी आवश्यक निधी दिला जाणार आहे. विकासकामे का रखडली याची कारणमीमांसा शोधली जाणार आहे. रन-वे, संरक्षण भिंत, विद्युत कामे, एटीएस टाॅवर आदी महत्त्वाच्या विकासकामांना प्राधान्य देत आघाडी सरकारच्या काळातच बेलोरा विमानतळाहून टेक ऑफ होईल, अशी तयारी करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.