लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना चाचणीकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान सहा ते सात दिवस लागत आहेत. तोवर या पॉझिटिव्हचा सर्वत्र मुक्त संचार झालेला असतो. यात यंत्रणेची दिरंगाई असल्याने कसा रोखणार कोरोना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.काही रुग्ण अँटिजेन चाचणीच्या आधारे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले व उपचारानंतर सहा दिवसांनी त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला. त्यानंतर तुम्ही आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असल्याचे फोनद्वारे सांगण्यात येत आहे. या व्यक्तींनी जर ॲन्टिजेन चाचणी केली नसती, तर त्याला पॉझिटिव्ह आहे, हे माहिती व्हायला सहा ते सात दिवस लागले असते व त्याचे संसर्गातून कित्येक जण बाधित झाले असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. १ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत १८,००७ रुग्णांची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार, तर महापालिका क्षेत्रात २६ हजारांच्या घरात आहे. आता अमरावती शहरच आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. मात्र, शासनाचे गाईड लाईननुसार येथे पुरेशा तरतुदी लागू केलेल्या नाहीत. शहरात साईनगर, राजापेठ, दस्तुरनगर, अर्जुननगर आदी भाग कोरोनाचे हॉट स्पॅाट बनले आहेत. याशिवाय ग्रामीणमध्ये अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, मोर्शी तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतीच आहे. या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायला पाहिजे. मात्र, अलीकडे या प्रकाराचा विसर आरोग्य यंत्रणेला पडला आहे.
स्वॅबनंतर होणारी प्रक्रिया
संशयित रुग्णाने स्वॅब दिल्यानंतर त्याला साधारणपणे उणे २५ तापमानात ठेवण्यात येते व त्यानंतर सायंकाळी वा दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. या ठिकाणी मशीनमध्ये एका वेळी किमान २०० नमुन्यांची तपासणी होते. प्रक्रियेला चार तास लागतात. येथून रिपोर्ट सीएस कार्यालय व तेथून डीएचओ व एमओएच यांच्याकडे जातात. यानंतर संबंधित व्यक्तीला पॉझिटिव्ह अहवालाबाबत फोन केला जातो.
येथे होते दिरंगाई
स्वॅब सेंटरमधील नमुने पुरेसे ‘फ्रोजन आईस पॅक’ झाले नसतील, तर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. लॅबमध्येही अगोदरचे प्रलंबित नमुने मशीनवर लावले गेले असतील, तर थोडा उशीर होतो. लॅबद्वारे अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास आरोग्य यंत्रणेद्वाराही फोन करण्यास पुढचा दिवस निघतो.
यंत्रणेचा आढावा
संक्रमित रुग्ण लवकर निष्पन्न व्हावेत, यासाठी एका रुग्णामागे किमान १५ ते २० कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. या अनुषंगाने मंगळवारी बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा आयुक्तांनी घेतला. आरोग्य विभागासोबत इतर विभागांनी समन्वय साधून यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.