धारणी पोलिसांची कारवाई, औरंगाबाद येथील दाेन संस्थाचालकांनी बनावट नियुक्तिपत्र केले होते तयार
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्प कार्यालयाची कोैशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, रिटेल मार्केटिंग, वॉर्ड बॉय प्रशिक्षणाच्या नावे ४२.५० लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी औरंगाबाद येथील दोन संस्थाचालकांविरूद्ध बुधवारी धारणी पोलिसांत गुन्हे नाेंदविण्यात आले. रमेश शिवाजीराव जाधव (४०), अंगद साहेबराव जाधव (३९, रा. प्लॉट क्रमांक ५८, नाथपुरम, पैठण रोड, औरंगाबाद) असे दोन्ही आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, रमेश बालू पटेल (५६, रा. धारणी एकात्मिक आदिवासी प्रकल्प) यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली. औरंगाबाद येथील जाणता राजा मल्टिपर्पज चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष अंगद जाधव यांनी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षण व औरंगाबाद येथील श्रीमंत माधवराव सिंधियाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी रिटेल मार्केटिंग वॉर्ड बॉय प्रशिक्षण आणि परभणी येथील क्रांती ज्योती प्रमिलाबाई चव्हाण महिला मंडळाला हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षण कौशल्य विकास अंतर्गत आदिवासी मुले, मुलींना सन २०१३-२०१४ या वर्षाकरिता प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, संस्थांनी प्रशिक्षण कागदाेपत्रीच पूर्ण केले व बनावट प्रमाणपत्र दिले. औरंगाबाद येथील श्रीमंत माधवराव सिंधियाजी फाऊंडेशनचे सचिव शैलेश अंभोरे मयत असताना सन २०१४ मध्ये खोट्या मुद्रांकांवर स्वाक्षरी करून योजनेचा अटी-शर्ती सादर केल्या. बोगस व बनावट कागदपत्राचे आधारे प्रशिक्षण दिले. आदिवासी प्रशिक्षणार्थींची फसवणूक करण्यात आली. सन २०१४ ते २०१६ या कालावधीत घडलेल्या या प्रकरणी धारणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२०. ४६५. ४६८. ४७१ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.