२० भोर पक्षांची शिकार : मोराची शिकार करण्याचा फास ताब्यातअमरावती : विनापरवाना छर्ऱ्याची बंदूक हाताळत २० भोर पक्षांची शिकार केल्याप्रकरणी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर येथील पेट्रोलपंपाजवळ चार जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई वडाळी वनविभागाने केली आहे.मोहनसिंग कंकरसिंग ठाकूर (६५), विजयकुमार मोहनसिंग चितोडिया (३६), राजकुमार मोहनसिंग ठाकूर (२५), जितेंद्रसिंग मोहनसिंग ठाकूर (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळून एम.एच.०२, एल.ए. ३२७३ या क्रमांकाची मारुती व्हॅनसुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. काही महिन्यांपांसून नांदगाव खंडेश्वर परिसरात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांनी गुरुवारी शिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी मोठ्या शिताफीने सापळा रचला. जंगलातून वन्यप्राण्यांची शिकार करुन भोर या पक्षाचे पंख काढताना चार जणांना रंगेहात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. सुमारे २० भोर पक्षांचे पंख काढून ते मांस जप्त करण्यात आले आहे.हे मांस कोणत्या वन्यप्राण्यांचे आहे, हे पुढील तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय वनअधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती लाकडे यांनी दिली. तसेच या शिकाऱ्यांकडे छर्ऱ्याची बंदूक, मोराची शिकार करण्यासाठी वापरला जाणारा फास ताब्यात घेण्यात आला आहे. शिकाऱ्यांकडे छर्ऱ्याची बंदूक आढळल्याने आतापर्यंत या शिकाऱ्यांनी अनेक वन्यप्राण्यांची शिकार केल्याची बाब स्पष्ट होत आहे. नांदगाव परिसरात हरिण, ससे, नीलगाय, रानडुक्कर, तितेर, बटेर आदी वन्यप्राणी मोठया प्रमाणात आहे. या शिकारप्रकरणी वन्यजीव अधिनियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वडाळीचे वन परिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांच्या मार्गदर्शनात डी.यू. खवले, व्ही.आर. बारब्दे, पी.डी. दारव्हेकर, नीलेश तरवाडे, एम.पी. ठाकूर, एस.बी. तऱ्हेकर, सुभाष गवई या वनअधिकाऱ्यांनी कारवाई केली. (प्रतिनिधी)
छर्ऱ्याच्या बंदुकीसह चार अटकेत
By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST