अमरावती : शहर गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी पाकिजा कॉलनी ते ट्रान्सपोर्टनगर भागातून चारचाकी वाहनाने जाणाऱ्या आरोपीकडून १६ ग्रॅम ५३० मिली मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. आरोपीकडून ८३ हजारांच्या एमडीसह ८ लाख रुपयांची एसयूव्ही कार जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद एहसान मो. इसाक (३३, पाकिजा कॉलनी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याला गुरुवारी अमरावती सत्र न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ‘म्याव म्याव’ म्हणून ओळखला जाणारा तो अंमली पदार्थ आरोपीने कुठून मिळविला, तो कुणाला विक्री करण्यासाठी जात होता. तस्करीचा सूत्रधार कोण, या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून मिळविली जातील, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी दिली.
मेफेड्रॉन हे सिंथेटिक सायकोॲक्टिव ड्रग आहे. याला एम कॅट किंवा व्हाईट मॅजिक या नावानेही ओळखले जाते. हे ड्रग्ज विविध मोठ्या पार्ट्यांमध्ये वापरले जाते.