ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
वरूड : स्थानिक टपाल कार्यालयामागे आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री ९ वाजता धाड टाकली. येथून चार जणांना दोन लाखांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. या कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वरुडात आयपीएल क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सूरज सुसतकर, पोलीस कर्मचारी चेतन दुबे, अमित वानखडे, युवराज मानमोठे, दीपक सोनाळेकर, नीलेश डांगोरे, चालक मानकर यांच्या पथकाने स्थानिक टपाल कार्यालयामागील परिसरात धाडसत्र राबविले. येथून नितीन कुबडे (३०), दीप कडूकर (२२) ,शुभम शेगेकर (२१), धीरज कोटेचा (१९, सर्व रा . वरूड) यांना क्रिकेट सट्टा खेळताना रंगेहाथ पकडले. आरोपीकडून रोख ५ हजार ६०० रुपये, ४५ हजारांचे चार मोबाईल, आयपीएल साहित्य आणि टीव्ही, दीड लाखांंच्या दोन दुचाकी असा २ लाख ६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
----------------
सट्ट्याच्या मोहजाळात युवा वर्ग
शहरासह तालुक्यात लाखो रुपयांचा ऑनलाईन आयपीएल क्रिकेट सट्टा खेळला जात आहे. यामध्ये अनेक तरुण गुंतले आहेत. अपेक्षित परिणाम न आल्याने अनेकांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्या. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. मंगळवारी रात्री अटक केलेले आरोपीदेखील युवावस्थेतीलच आहेत.