पान १
अमरावती : शहर गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी पाकिजा कॉलनी ते ट्रान्सपोर्टनगर भागातून जाणाऱ्या आरोपीकडून १६ ग्रॅम ५३० मिली मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. मात्र, अटोतील आरोपीने चौकशीदरम्यान ‘मी तो नव्हेच’ चा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडीदरम्यान पकडलेला आरोपी प्यादा की म्होरक्या, हे निश्चित होणार आहे.
‘एमडी’ बाळगणारा आरोपी मोहम्मद एहसान मो. इसाक (३३, पाकिजा कॉलनी) याला गुरुवारी न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हा अंमली पदार्थ आरोपीने कुठून मिळविला, तो कुणाला विक्री करण्यासाठी जात होता, तस्करीचा सूत्रधार कोण, या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून मिळविली जातील. आरोपीकडून ८३ हजारांच्या एमडीसह ८ लाख रुपयांची एसयूव्ही जप्त करण्यात आली आहे.
//////////////
पार्ट्यांमध्ये वापरले जाते ‘मेफेड्रॉन’
मेफेड्रॉन हे सिंथेटिक सायकोएक्टिव ड्रग आहे. याला एम कॅट किंवा व्हाईट मॅजिक या नावानेही ओळखले जाते. हे ड्रग्स विविध मोठ्या पार्ट्यांमध्ये वापरले जात असल्याची माहिती आहे. मेफेड्रॉन पानात किंवा पान मसाल्यात मिसळून तोंडावाटे सेवन करतात किंवा ते नाकपुड्यातून सुर्रकन ओढून घेतले जाते.
//////////
असा होतो अंमल
मेफेड्रॉनच्या वापरामुळे व्यसनींना उत्साहाची भावना निर्माण होते. फाजील आत्मविश्वास वाढतो, माणूस खूप बडबडायला लागतो. भिन्नलिंगी साथीदाराला वारंवार स्पर्श करण्याची ईच्छ होते. त्यामुळे पार्टीत किंवा नववर्षाच्या स्वागत पार्टीत हे ड्रग अतिशय लोकप्रिय असते.
///////////////////
असे आहेत दुष्परिणाम
या ड्रगची धुंदी उतरल्यावर वापरणारा एकदम डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. मेफेड्रॉनचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीची भूक मरते, कधी कधी ते झोपेत भीतीदायक रीतीने दात खायला लागतात. काहीवेळा दाताला गार्ड न बसवल्यास दाताचा भुगा होईल, असे वाटायला लागते. डोकेदुखी, शरीराचे तापमान वाढते, रक्तदाब वाढतो, चिंताग्रस्तता वाढते.
/////////////////
मानवनिर्मित ड्रग
अंमली पदार्थांच्या यादीत मेफेड्रॉन हे ड्रग ५ फेब्रुवारी २०१५ ला दाखल झाले. हा मानवनिर्मित ड्रग आहे. या मेफेड्रॉनचे रासायनिक सूत्र ४- मिथाईल मेथ कॅथीनॉन असे आहे. या ड्रगचे आणखी एक नाव ते म्हणजे म्याँव म्याँव. हे ड्रग घेतले, डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्यासारख्या होतात आणि चेहरा मांजरीसारखा वाटतो.
/////////
कोट
चारचाकी वाहनातून जाणाऱ्या आरोपीकडून मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याला न्यायालयाने २९ पर्यंत कोठडी सुनावली. त्यादरम्यान गुन्ह्याची उकल होईल.
- अर्जुन ठोसरे,
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा