पोलीस वर्तुळात खळबळ : कोतवाली ठाण्यातून आरोपी पळाल्याचे प्रकरणअमरावती : कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत सहायक पोलीस उपनिरीक्षकांसह पाच पोलिसांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सोमवारी निलंबित करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी शहर कोतवाली ठाण्यातून आरोपीने पलायन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.शुक्रवारी सायंकाळी शहर कोतवाली ठाण्यातील कोठडीतून कुख्यात घरफोड्या कुलदीपसिंह जुनी (रा. नागपूर) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. आरोपी कोठडीत असताना पोलीस कर्मचारी दिनेश वानखडे यांनी दार उघडून शौचालयात पाणी टाकले. दरम्यान आरोपीने वानखडेला धक्का देऊन पलायन केले. सोबतच कोठडी बाहेर तैनात असणाऱ्या पोलिसांच्या तावडीत सुध्दा आरोपी सापडला नाही. बापट चौकाच्या बाजूने आरोपीने पलायन केल्यानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. सुदैवाने गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या पथकाने तीन तासांत आरोपीला शोधून काढले. आरोपी पसार होण्याची गंभीर बाब लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या अहवालावरून पोलीस आयुक्तांनी गार्ड ड्युटीवर तैनात सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय तायडे, जमादार दिनेश वानखडे, रमेश तायवाडे, पोलीस शिपाई दीपक राजस आणि किशोर गोळे यांनी निलंबित करण्याचे आदेश दिलेत. कोठडीतून आरोपीने पलायन करण्याची बाब ही अतिशय गंभीर असल्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)दोन महिन्यांपूर्वी केले होते सतर्कदोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना लॉकअपची सुरक्षा, स्वच्छता आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल करण्याचे लेखी आदेश दिले होते. सोबतच आरोपीबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरीदेखील निष्काळजीपणा केल्यामुळे शहर कोतवालीच्या लॉकअपमधून आरोपी पसार झाला. या चौकशीत गार्ड ड्युटीवर २४ तास तैनात पोलीस कर्मचारी अनुपस्थित असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. ठाणेदारांचीदेखील विभागीय चौकशी !पोलीस ठाण्यातील मुख्य अधिकारी ठाणेदार यांच्यावर ठाण्यातील सर्व कामकाजाची जबाबदारी असते. त्यामध्ये पोलीस कोठडीतील आरोपीकडे लक्ष ठेवण्याचे कामसुध्दा ठाणेदारांचेच आहे. त्यामुळे याप्रकरणी ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांचीसुध्दा विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे.
एएसआयसह पाच पोलीस निलंबित
By admin | Updated: May 24, 2016 00:33 IST