अमरावती : पाच महिन्यांपूर्वी ६५० रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरची किंमत मार्च महिन्यात ८७५ रुपये झाली आहे. केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत २२५ रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सिलिंडरचे भाव केवळ १८ रुपयांनी कमी झाले आहेत. आता सिलिंडर ८५७ रुपयांना उपलब्ध होत आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडर प्रत्येक घरी पोहोचला आहे. उज्ज्वला योजना ज्यावेळी राबविली जात होती, त्यावेळी सिलिंडर केवळ ४०० ते ५०० रुपयांमध्ये उपलब्ध होत होता. त्यामुळे गरीब लाभार्थींना गॅस सिलिंडरची उचल केली. योजना बंद होताच एलपीजी गॅसचे भाव गगनाला भिडण्यास सुरुवात झाली. दरमहा २५ ते ५० रुपयांची वाढ होत होती. नोव्हेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर केवळ ६५० रुपयांमध्ये उपलब्ध होत होता. दरमहा भाववाढ होऊन आता हे दर ९०० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. एवढ्या उच्च्चांकी दराने गॅस सिलिंडर खरेदी करणे अशक्य झाले आहे.
बॉक्स
उज्ज्वल योजनेचे सिलिंडर रिकामेच पडत
उज्ज्वल गॅस योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. सिलिंडर अनुदानावर मिळत असल्याने दुर्गम भागातील कुटुंबानीही ते खरेदी केले. आता भाववाढ झाल्याने हे बंब घरीच रिकामे पडून आहेत. पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. चुलीशिवाय पर्याय नाही, ही बाब ग्रामीण भागातील गरीब महिलांच्या लक्षात येण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे जंगलाची तोड वाढली आहे.
बॉक्स
दरवाढीचा आलेख
नोव्हेंबर ६५०
डिसेंबर ६१४
जानेवारी ७४४
फेब्रुवारी ८११
मार्च ८७५
एप्रिल ९००
कोट
सिलिंडर स्वस्त असल्याकारणाने स्वयंपाक करण्याबरोबरच पाणी गरम करण्यासाठी गॅस गिझर खरेदी केले. आता भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गॅस गिझरचा वापर बंद केला आहे.
- प्रगती बांबोडे, गृहिणी
कोट
गॅस ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. शहरामध्ये स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, शासनाने दर आवाक्याबाहेर केले आहेत. सबसिडीसुद्धा कमी झाल्याने गरीब कुुटुंबे अडचणीत आली आहेत.
- राजश्री धोटे, गृहिणी
कोट
उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर खरेदी केला. आता मात्र ९०० रुपयांवर सिलिंडर पोहोचला आहे. एवढी किंमत देऊन गॅस खरेदी करणे आता शक्य नसल्याने घरचा सिलिंडर रिकामाच पडून आहे. चुलीवर स्वयंपाक सुरू आहे.
- मंजुळा वासनिक, गृहिणी